Saturday, 16 December 2023

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात

हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे दिव्य अनुभव आले,त्या अनुभूतीची ,त्या दैवी सहवासाची आणि कृपेची शब्दात केलेली मांडणी म्हणजे हे पुस्तक!

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास
लेखिका:  गौरी अनिल इंदुलकर
प्रकार:  अध्यात्मिक आत्मकथन
पृष्ठ: २२६
मूल्य: ३००

विज्ञानवादी किंवा तर्काने समजून घेणाऱ्या  विश्लेषकाला या पुस्तकातील सर्व घटना योगायोग किंवा सामान्य घटना वाटू शकतील. काहींना अंधविश्वास ही वाटेल...पण श्रध्देने जर विचार केला तर यातील प्रत्येक प्रसंग आपल्याही आयुष्यात येऊ शकतो,आपल्यालाही अनुभूती होऊ शकते...अगदी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा वाचताना देखील!

अमेरिका सारख्या अतिशय सधन देशात रियल इस्टेट सारख्या व्यवसायात अमाप पैसा आणि संपत्ती मिळवलेल्या लेखिकेला वाचनाची प्रचंड आवड! त्यातही अध्यात्मिक पुस्तकांची ओढ अधिक!
ज्ञानेश्वरी चे वाचन करतां करतां लेखिका कुंडलिनी संदर्भात वाचते आणि त्याचा अभ्यास करायला लागते.योगी कथामृत वाचून साधना सुरू करते.श्री गाजाजन विजय ग्रंथ सहज झोपाळ्यावर बसून वाचताना असा काही दिव्य अनुभव येतो,की असे ग्रंथ वाचताना काही नियम असावेत असं वाटतं आणि अनुभवी साधकांशी संवाद सुरू होतो....त्यातून अनेक असे प्रसंग घडतात...जे कल्पनेत ही येऊ शकतं नाहीत.

प्रत्येक प्रकरण वाचताना सजह आणि सोपे वाटतं...पण वाचन झाल्यानंतर मात्र आपल्याला त्या मागची मोठी भूमिका समजते.त्याचा परिणाम होऊ लागतो.आपल्याला माहीत असलेल्या किंबहुना अनेक वेळा वाचलेल्या पुस्तकांचे,ग्रंथांचे मोल समजून येते...जसे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी!

प्रस्तुत पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्रिशूळ आहे. त्या त्रिशुलाचे लेखिकेला प्रकाशमान असे दिव्य दर्शन झालेलं आहे...
या पुस्तकाच्या बाबत लेखक आणि इतिहासकार असलेले संदीप भानुदास तापकीर  लिहितात,"अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमय विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी अनिल  इंदुलकरांचे "देवाच्या शोधात" हे पुस्तक! दहा वर्षे मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींची भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वीस वर्षे देवी साधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठीत करणाऱ्या अनुभवांची आत्मकथा वाचताना आपण भारावून जातो. विशेष म्हणजे मुखपृष्ठावरील त्रिशूल व कुंडलिनी शक्ती यांचे प्रत्यक्ष जिवंत दिव्य दर्शन लेखिकेला झाले आहे."

"आपल्याला आलेल्या अनुभवांची इतर साधकांना माहिती मिळवून प्रोत्साहन मिळावे, हा लेखिकेचा उद्देश निश्चित सफल झाला आहे. देवी अनुभवाचे नाते आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, धर्माशी व राष्ट्राची नक्कीच आहे, हे या पुस्तकात वाचायला मिळते.मोठमोठे धार्मिक ग्रंथ वाचायला आजकाल कोणालाच वेळ नाही. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक तसेच अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली आहे."


पुस्तक : सप्त सरितांचा प्रदेश लेखक संजीव संन्याल

पुस्तक : सप्त सरितांचा प्रदेश

लेखक: संजीव संन्याल

मराठी अनुवाद: संजीव जोशी

प्रकाशन: भारतीय  विचार साधना

पृष्ठ:३२६मूल्य:४००/


कृष्ण काळा का? बालाजी किंवा विठ्ठल ही काळे कसे?द्रौपदी ही काळी होती म्हणे!काळे असणे हेच कधीकाळी भारतात सुंदरतेचे लक्षण मानले जायचे! आहे ना मजेशीर!

 पृथ्वीवरील खंड जेंव्हा दूर दूर जाऊ लागले त्यावेळी भारतीय उपमहाद्वीप कसे कसे वर रेटत गेले आणि भूगोल कसा कसा बदलत गेला असा थोडासा जड विषय घेऊन सुरू झालेले हे पुस्तक पहिल्या प्रकरणात तर बोजड वाटू लागते..कारण त्यात अजुन  भारतीय माणूस आलेला नसतो... आणि जसे जसे आपण पुढे जाऊ तसे तसे लेखक पुरावा देत देत आपल्याला झटके देत जातो.

लेखक अतिशय चलाख आणि साळसूद म्हणावा तसे स्वतःवर काहीही घेत नाही.कोणताही दावा करत नाही..पण मांडणी मात्र भयंकर करतो ती ही पुराव्यानिशी! निर्णय मात्र वाचकांवर सोडून मोकळा होतो.

अर्ली इंडियन्स हे मूळ भारतीय हे एका लुप्त नदीकाठी विकसित झाले. ऋग्वेदात त्या नदीचा शकडो वेळा उल्लेख केला आहे ती सरस्वती! हिमालयातून उगम होऊन ती भारताच्या पश्चिमेला सिंधू सागरास (आरबी समुद्र)  मिळणारी नदी एकेकाळी सर्वात शक्तिशाली होती.सतलज आणि यमुना तिच्या उपनद्या! भूगोलाचे परिवर्तन होऊन यमुनेच्या प्रवाहाने दिशा बदलली...त्यापुढे जाऊन सतलज ही सरकली आणि सिंधू ला भेटली.दरम्यान प्रलयंकारी पुर ही आले...पण मूळ नदी ही पावसाळी नदी झाली.काही महिने वाहू लागली.ती सर्वात अलीकडे २०१० ला पुन्हा प्रवाहित झाली...ती लुप्त नदी म्हणजे त्या काळची सरस्वती आणि अलीकडे घग्गर होय! ही गोष्ट दुसरें प्रकरण वाचताना आपोआप स्पष्ट होत जाते...

हे वाचून पुस्तकाचा विषय काय आहे असा  प्रश्न पडू शकतो.पुस्तकाचा मुख्य विषय आहे भारतातील बदलती नगर रचना! बनते बिघडते  म्हणावे तसे कसे कसे नगर विकसित होत गेले  असा विषय मांडत मांडत फटके मारत मारत लेखक पुढे सरकत जातो. हडप्पा पासून सुरु होऊन अलीकडच्या गुडगाव पर्यंत अनेक महानगरांच्या कथा आणि वर्णन वाचताना मनात अभिमानाचे कंप सुटतात...हे वाचताना कधी फियान(फा - हियान चिनी प्रवासी) येतो तर कधी रोमन लेखक प्लीनी येतो (प्राचीन रोमन अर्थतज्ञ). अनेक माहित नसलेले प्राचीन लेखक आणि त्यांचे साहित्य आपल्याला माहिती होते.इंडिका लिहिणारा मेगॅस्थेनीस(मॅसेडोनियन वकील: पाटलीपुत्र चे वर्णन - लाकडी फळ्यांचा उपयोग केलेलं शहराभवती कुंपण , खंदक, ६४ प्रवेशद्वार, साडेचौदा किमी लांब अडीच किमी रूंद शहर.) अधून मधून दिसतो....कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर वाहतुकीचे नियम ही लिहिले गेले आहेत.रस्त्यावर गाडी उधळली तर त्याने दंड लावण्याची सूचना त्याच काळात केली होती..अपवाद फक्त बैल पागल झाला असेल किंवा कासरा( बैलाची दोरी) तुटली असेल!

हे वाचून तुम्ही म्हणाल यात काय प्रक्षोभक? आहे ते तर आहेच! उदाहरण पाहू! नंद राजाचे राज्य जिंकून चंद्रगुप्त मौर्य चक्रवर्ती सम्राट होतो.चाणक्याच्या मदतीने भारतातील सर्वात मोठे साम्राज्य निर्माण करतो....ते साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य जे की मगध प्रदेशात! हा मगध प्रदेश चक्क महाभारत काळापासून प्रचंड  शक्तिशाली आहे. महाभारत काळातील जरासंध असो की गुप्तकाळात  राजा बिंबिसार सर्व शक्तिशाली! कारण या प्रदेशाची सुपीकता आणि तेथील लोह!

 आजोबा सम्राट चंद्रगुप्त याने निर्माण केलेले राज्य नातू सम्राट अशोकाच्या(उत्तरकाळात) अंमलाखाली खिळखिळे झाले.आपण सम्राट अशोकाने राज्य त्याग केला असे वाचतो पण लेखक लिहितो,
"अशोकाने इ.पू.२३२ मध्ये वयाच्या ७२ व्या वर्षी मृत्यू येईपर्यंत राज्य केले.....शेवटी शारीरिक दौर्बल्यामुळे कार्यक्षमता कमी होऊन सुद्धा त्याने सत्ता पदाचा त्याग केला नाही.साम्राज्याची स्थापना करणारे त्याचे आजोबा व चाणक्य यांच्या अगदी विरुद्ध त्याचे वर्तन होते. जराजर्जर राज्यकर्त्यांच्या प्रश्‍नाने भारताचा अनेक शतके पिच्छा पुरवला आहे."

याच  पुस्तकात कधीही ज्याचा उल्लेख टाळला जातो त्या वात्सायन ने लिहिलेल्या कामसूत्र ग्रंथाचा हवाला देऊन त्या काळची सामाजिक स्थिती सांगितली आहे. गुलछबु लोकांचे जीवन सुखी व्हावे म्हणून त्यात त्या काळी काही सामाजिक टिप्स सुद्धा होत्या.गमंत नाही हो , त्याच ग्रंथात  सुखी चैनीत जीवन जगण्यासाठी शहरात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. वाढत्या नागरीकणामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला तर नवल नाही.

 धार्मिक वाद हे केवळ विद्वानांपुरते मर्यादित होते असे लेखक लिहितो.सामान्य जनता सर्व उत्सव एकत्र पार पाडत असे.एकत्र राहत असे...
वैदिक गुरू चाणक्य यांचे शिष्य चंद्रगुप्त मौर्य हे आयुष्याच्या शेवटच्या काळात जैन धर्म स्वीकारून वानप्रस्थ झाले.कर्नाटकात ज्या टेकडीवर त्यांनी उर्वरित आयुष्य काढले ती टेकडी आजही चंद्रगिरी नावाने प्रसिद्ध आहे. तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू सम्राट अशोक महात्मा बुद्धांचे अनुयायी झाले होते.त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला.

 गुप्त काळातील पाटलीपुत्र मधील रथ यात्रेसंदर्भात   फा - हीयान   लिहितो," चार चाकी गाड्या तयार केल्या होत्या.त्यावर पाच मजली इमारत असावी इतके उंच मनोरे केले होते. (लोकांनी त्याला सजवले होते.) लोकांनी पूज्य देवतांच्या मूर्ती गाड्यांच्या मध्यभागी व बुद्धाच्या मूर्ती चारी कोपऱ्यात ठेवल्या होत्या....लोक हे रथ ओढत असत. राजघरान्यापासून अगदी गरिबांपर्यंत सर्व भक्तजन या समारंभात भाग घेत.याचाच अर्थ त्याकाळी धार्मिक भेद हे केवळ विद्वान लोकांच्या विद्वत चर्चेमध्ये असतील!

या पुस्तकात नगरांची माहिती घेता घेता अनेक अज्ञात  मजेशीर गोष्टी वाचायला मिळतात.जसे की श्रीलंकेत लोक स्वतःला सिंह समजून घेतात.त्यांची भाषा सिंहली! पण श्रीलंकेत एकही सिंह नाही! त्यापुढे त्यांचे विरोधक मात्र स्वतःला वाघ(तामिळ वाघ) मानतात.पण ते ज्या भारतातून गेले आहेत त्या भारतात वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी आहेत.हा एकच देश आहे जेथे वाघ आणि सिंह आहेत....पण सिंह प्राण्याचा वेदांमध्ये फारसा उल्लेख नाही. पण भारतीयांना सिंहाचे फार आकर्षण आहे.म्हणून अनेकांच्या शेवटी सिंह किंवा सिंघ लावले जाते.सिंह हा राजा! वाघासारखा जंगलात लपून नाहीं राहत.तो उघड्यावर राहतो.कुटुंबात राहतो...त्यामुळे भारतात राज्याच्या राजगादी ला सिंहासन असेही म्हटले जाते! मग हा सिंह वेदांमध्ये का नाही? कारण त्याकाळात त्या भागात जंगल आणि पाणी मुबलक होते.सिंह यापासून दूर राहतो.

पुस्तकाचा अवका इतका मोठा आहे की त्याचा परिचय देखील तसाच मोठा होत गेला आहे...
असो....

जेरुसलेम मधून भारतात ज्यू आले त्यांचे भारतीयांनी स्वागत केले.पण पोर्तुगिजांनी भारतात त्यांना बळजबरीने धर्मांतरित केले... तसेच एक माहिती अशी ही वाचायला मिळते की क्लिओपात्रा भारताकडे निघाली होती...पण रस्त्यात तिची हत्या झाली.

 भारताविषयी आकस - आकर्षण असलेले देशी - विदेशी  विद्वान भारतीयांच्या उगमाचे सिद्धांत सांगत आले. अनेक वाद निर्माण केले गेले.काही झाले.सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती नव्हती! आर्य - अनार्य! आर्य आणि द्रविड असे हे वाद! पण लेखकाने अतिशय अनोख्या शैलीत या सगळ्यांना कमजोर ठरवले आहे....म्हणून हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. त्यातील तथ्य शिधावेत. खरं की खोटं स्वतः ठरवावं.

डाव्या वळणाच्या अर्ली इंडियन्स पेक्षा हे पुस्तकं नक्की वाचायला उजवे आहे हे पक्के!कारण हे पुस्तक वाद वाढवत नाही तर एकोपा कसा होता हे सांगते.उत्तर दक्षिण वेगळे नाहीत हे सिद्ध करते. ऋग्वेदातील त्या प्रसिद्ध युद्धाचे ही वर्णन लेखक करतो ज्यात दहा जमतींच्या युती विरुद्ध भारतीय एक जमात लढली.

 लेखक संजीव संन्याल हे निश्चितच इतिहासकार किंवा त्या विषयातील पदवीधर नाहीत..ते आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे अर्थतज्ञ! पण त्यांनी एक नव्हे दोन नव्हे चक्क आडीच वर्षे या विषयासाठी सुट्टी घेऊन अभ्यास आणि प्रवास करून हा लेखन प्रपंच केला.शेवटी या पुस्तकाची मूळ इंग्रजी प्रत पेंग्विन प्रकाशनाने हिसकावून घेऊन मुद्रित केली...कारण लेखक या विषयात आणखी अभ्यास करू इच्छित होते.जगभर लाभलेला प्रचंड प्रतिसाद हा पुस्तकाला नव्हे तर भारतीय संस्कृती व इतिहासाला लाभला असा नम्र भाव लेखकाने व्यक्त केलेला आहे.

एकात्म एकसंघ देश एका बाजूला आणि जात, प्रांत,भाषा, वंश यातून वाद निर्माण करणारे दुसऱ्या बाजूला....ही स्थिती आज देशात आहे....मान्य करणे वा नाकारणे हे आपल्यावर आहे.


वाचन संस्कृती अबाधित राहण्यासाठी

वाचन संस्कृती अबाधित राहण्यासाठी वाचनाचे महत्व 
      

 ‘वाचाल, तर वाचाल’ या म्हणीचा अर्थ आणि त्या अर्थाचे अन्वयार्थ किती समर्पक आहेत हे आजच्या घडीला समजत आहे. ‘ग्रंथ हेच गुरू’ असे म्हटले जाते. अर्थात माणसाच्या आयुष्यात एक ग्रंथ हा आमूलाग्र बदल करू शकतो. गुरू जसा आयुष्यात मार्गदर्शन करत असतो, त्याचप्रणाणे ग्रंथ वाचनाने आपल्या आयुष्याला विविध वळणे मिळत असतात. आज वाचन कमी होत आहे, असे प्रकर्षाने जाणवत आहे.

 तरुणाईचा वाचनाकडे कल कमी असल्याने वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत आहे, असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये.


तासन्तास ऑनलाईन चॅट करत राहणारी आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. माणसाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे ज्ञान आणि हे ज्ञान संपादन करण्यासाठी वाचण्याशिवाय पर्याय नाही. या स्पर्धेच्या अहमहमिका युगात कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर त्या क्षेत्रातील ज्ञान असणे अनिवार्य आहे, तर आणि तरच तुम्ही त्या क्षेत्रात टिकाव देऊ शकता. ‘नॉलेज ईज पॉवर’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. ‘वाचाल, तर वाचाल’ म्हणजे तुम्ही जर वाचाल तरच स्पर्धेच्या युगात वावरू शकाल. वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पयार्याने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल. माणूस ज्ञानाच्या या शक्तीच्या सहाय्याने त्याच्या सदसद्विवेकबुद्धीत भर पडते तसेच प्रगल्भ होतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो.

 पूर्वीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन कमी आहे, अशी तक्रार सर्वच थरातून होत आहे. याला स्वाभाविकपणे कारण ते म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडिया आणि त्याच्या सभोवती असणारे वातावरण, कुटुंबात जर वाचन केले जात असेल, तर मुलांना वाचनाची गोडी निर्माण होईल. परंतु याउलट घरात वातावरण असेल, तर मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल? यासाठी मुख्यत: पालकांनी वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. आपण अनेकवेळा ऐकले असेल की, पूर्वीच्या लोकांना सकाळी चहाबरोबर पेपर वाचण्यासाठी लागत असे. पेपर वाचल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नसे; परंतु आता काळानुरूप परिस्थिती बदलली आहे. पूर्वी पेपरमधून बातम्या वाचल्यामुळे वाचनाची आवड निर्माण होत असे. परिणामी ‘वाचनाचे वेड’ यामुळे वाचन रोज होत असे, कालांतराने त्याच पेपरमधील बातम्या आपण रोडिओवर ऐकू लागलो. पुढे टीव्हीचा उदय झाल्याने त्याच बातम्या टीव्हीवर पाहू लागलो आणि आता सोशल मीडियामुळे बातम्या ऑनलाईन पाहू लागलो. विज्ञानाने प्रगती केल्यामुळे आपण फॉरवर्ड झालो असलो तरी, वाचनातून आनंद घेण्याचे आपण हरवून बसलो. वाचनातून जो आनंद मिळतो तो आनंद विरळाच असतो.

वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या जीवनाचे सोने झाले. अगदी लहानपणी केळुसकर गुरुजींनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘बुद्ध चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. या पुस्तकाचा परिणाम एवढा झाला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले, तर ‘राईटस ऑफ मॅन’ हे थॉमस पेन यांचे पुस्तक वाचून महात्मा फुले यांना प्रेरणा मिळाली, त्यामुळे महात्मा फुले थोर समाजसेवक झाले. हे सर्व फक्त आणि फक्त वाचनामुळे शक्य झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत.
 वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड लहानपणापासूनच निर्माण होणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायची असेल, तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण करणे गरजेचं आहे, जेवढे वाचन कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल. ‘ग्रंथ हे गुरू’ आहेत आणि ग्रंथ वाचनाने दिशा ठरत असते, एक पुस्तक हे एका मित्रासारखे असते. मित्रांचा जसा आपल्यावर प्रभाव असतो, त्याचप्रमाणे एक पुस्तक आपल्यावर विविध पैलू पाडण्यास कारणीभूत ठरते. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते आणि असे मस्तक सहजासहजी कोणाही पुढे नतमस्तक होत नसते, असे म्हटले जाते. वाचनाची सवय एकदा लागली की, माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गत्रेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो. मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने उपलब्ध असूनही, तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. अधिक अधिक इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. नव्या माध्यमांच्या आगमनाने वाचन संस्कृती लोप पावत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनेक महान व्यक्तींनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल, तर वाचन करा’ असा संदेश दिला आहे. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असते आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.

 वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. आज वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे. विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीत खेळण्याबरोबर विविध विषयांचे अवांतर वाचन केले पाहिजे. कारण अवांतर वाचनामुळे मतपरिवर्तन होऊ शकते.

पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. वाचनाने आपली शब्दसंपदा वाढते, अनुभवांसह कल्पना, आशा-आकांक्षा जागृत होतात, वाचनामुळे रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेत भर पडते, सहृदयता, दुस-याच्या दु:खाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. वाचनामुळे मेंदूला चालना मिळते, नवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होते, वाचनामुळे नवनवीन माहिती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते. वाचनामुळे आपल्याला इतरांचे ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो. सामान्य ज्ञान वाढते, वाचनामुळे आपण मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. वाचनामुळे अनेक फायदे आपण घेऊ शकतो. मानसिक उत्तेजना मिळण्यास मदत होते, मनावरचा ताण कमी होतो, एकाग्रता वाढल्यामुळे एखादे ध्येय गाठण्यास मनाची एकाग्रता कामी येते. माजी राष्ट्रपती स्वर्गीय ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती करत आहोत. पुस्तकांविषयी ही कायमची ओढ तरुणांच्याही मनात निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 
पालकांनी किंबहुना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांने घरात वाचनाची वातवरण निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये लहानपणापासून वाचनाची आवड आणि गोडी निर्माण होईल. तेव्हाच ख-या अर्थाने वाचन संस्कृती वाढण्यास मदत होईल.

Friday, 5 May 2023

पुस्तक: आर्यांचे आक्रमणअगा जे घडलेचि नाही!लेखक: मिशेल डॅनिनो

दक्षिण विरुद्ध उत्तर,तमिळ विरुद्ध हिंदी, आर्य विरुद्ध द्रविड असे भेद निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना खरा अभ्यास मान्य होईल का?

भारताची  एकात्मता आणि स्वाभिमान खंडित करण्यासाठी परकियांनी अनेक खोटे सिद्धांत मांडले.भेद निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर थेरिज पसरवल्या! काही भारतीयांनी ही त्यांना उचलून धरले....असाच एक सिद्धांत म्हणजे आर्य आक्रमणाचा सिद्धांत!

आर्य आक्रमण सिद्धांत खोडून काढणारे दोन ग्रंथ!

पुस्तक:आर्यांचे आक्रमण
अगा जे घडलेचि नाही!

लेखक: मिशेल डॅनिनो

मराठी अनुवाद: सुहासिनी देशपांडे

प्रकाशन: विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग

पृष्ठ:१५६ मूल्य:१५०/

संघटित करणाऱ्या, गौरान्वित करणाऱ्या ज्या अस्मिता आहेत,त्यावरच आघात करून वर्ग संघर्ष निर्माण करायचा! समाजाचे विघटन करून सत्ता बळकट करायची .ही निती इंग्रज आणि त्यानंतर डाव्या विचारधारा मानणाऱ्या लोकांनी भारतात जोरदारपणे राबवली.त्याचाच परिणाम म्हणून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, हिंदी विरोध अशा काही गोष्टी काहीकाळ या  देशात घडल्या.राष्ट्रीयत्व दुबळे करून प्रादेशिक अस्मिता उभ्या करताना ज्या सिद्धांतांचा उपयोग केला त्यात आर्य विरुध्द अनार्य हा एक होता.

पण हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे,असा निर्वाळा अनेक विद्वान देतात,त्यापैकी एक फ्रेंच विद्वान मिशेल डॅनिनो!

दुसऱ्या प्रकरणात लेखक काही विद्वानांची मतं देतात.पहिल्या प्रकरणात या सिद्धांताचा उगम कसा झाला याची माहिती दिलेली आहे.त्यात वेगवेगळी विद्वान आणि त्यांचे युक्तिवाद आहेत.

माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन-'एका मध्यवर्ती केंद्र स्थानापासून आर्यांचा प्रसार झाला.' हा सिद्धांत म्हणजे मनमानी व समर्थन करताना येण्याजोगे गृहीतक असल्याचे ते म्हणतात.

याच प्रकरणात आर्य सिद्धांत मांडणारे मॅक्स मुलर स्वतःचाच सिद्धांत कसा चुकला याचे विवेचन करताना सांगितले आहे.ते म्हणतात, "जेंव्हा मी आर्य म्हणतो त्यावेळी मला ना रक्त ना अस्थी ना केसांचा रंग ना कवटीचां आकार अभिप्रेत असतो, तर केवळ जे आर्य भाषा बोलतात ते आर्य, असे मला म्हणायचे असते,हे मी वारंवार स्पष्ट केलं आहे." १८८८ अर्थात पहिला सिद्धांत मांडला आणि त्याचे खंडन ४० वर्षांनी त्यांनी केलं.

मॅक्स मुलर यांनी भारतीय ग्रंथाच्या कलाविषयी आपल्या प्रसिद्ध अशा घोषणा पत्रात सन १८९० मध्ये लिहिले,"जगातील कोणतीही शक्ती हे कधीच निश्चित नाही करू शकणार की वेदांची निर्मिती इस.१००० वर्षांपूर्वी झाली, की १५०० की २००० की ३००० वर्षांपूर्वी झाली." स्वतःच्या आत्मचरित्रात त्यांनी या पुढं जाऊन लिहिलं आहे."वेदांच्या निर्मितीच्या वास्तविक कालासंबंधी म्हणायचे तर...जर आपण तो इसा पूर्व ५००० वर्षे निश्चित केला तर मला नाही वाटत त्याचे खंडन करेल."

याच प्रकरणात स्वामी विवेकानंद,स्वामी दयानंद सरस्वती,योगी अरविंद यांचे ही मत आणि तर्क दिलेले आहेत.

स्वामी विवेकानंद यांनी आर्य आक्रमण सिद्धांत अनेक वेळा खोडून काढला आहे.यासंदर्भातील त्यांची मतं येथे दिलेली आहेत.देश बांधवांना सावध करताना ते म्हणतात,"जेवढे तुम्ही द्रविडी आणि आर्य तसच,ब्राह्मण आणि ब्रह्मनेत्त्तर प्रश्न,या आणि अशा साऱ्या क्षुद्र ,निरर्थक गोष्टीवरून भांडत तंडत बसाल,तेवढे तुम्ही भारताच्या भवितव्यासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि सामर्थ्याचा संचय करण्यापासून वंचित राहल."

वरील विवेचन केवळ एका प्रकरणातील आहे.हे लहानसे पण फार महत्वपूर्ण माहिती असलेलं पुस्तक आहे.

पुढील प्रकरणात पुरातत्वीय पुरावे दिलेले आहेत.विविध ठिकाणचे उत्खनन आणि त्यात सापडलेल्या पुरातन वस्तू ,त्यांचे  फोटो आणि त्यांचे वर्णन यात वाचायला पाहायला मिळते.पुस्तकात या प्रकारच्या पुराव्यांचा मोठा भरणा आहे..

या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.विवेकानंद केंद्र द्वारा संचालित शाळांमध्ये हे अभ्यासक्रमात समाविष्ट केलं गेलेलं पुस्तक आहे.

स्वतः वाचवे.इतरांना वाचण्यासाठी प्रेरित करावे.हे पुस्तक आपण भेट देखील देऊ शकतो.

राष्ट्रीयत्वाची भावना दृढ करणारा संशोधन पर ग्रंथ!


Saturday, 29 April 2023

स्मृतिचित्रे /लेखक -लक्ष्मीबाई टिळक


               स्मृतिचित्रे.                  


लेखन: लक्ष्मीबाई टिळक
पहिली आवृत्ती:१९३४
सातवी आवृत्ती: २०१८(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:४५८ मूल्य:४००/

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. 
प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे.' 
स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. 
या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. 
यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. 
अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. 
हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. 
आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. 
दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. 
इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. 
यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. 
प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.

Friday, 14 April 2023

आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे


आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे

सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं

लेखिका: श्रीमती रमाबाई रानडे
पहिली आवृत्ती: १९१०
पाचवी आवृत्ती: २०१७(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पृष्ठ:२७२ मूल्य:३००/
या पुस्तकबाबत गोपाळ कृष्ण गोखले लिहितात,

"महाराष्ट्राचे मोठे भाग्य,हा ग्रंथ लिहिण्याचे श्री. वहिनीबाईंनी मनात आणले व हाती घेतलेले काम तडीसही नेले, हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य समजले पाहिजे. पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा तऱ्हेने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते, व तो वहिनीबाईंनी लिहिला हे फार योग्य झाले. कारण, हल्लींच्या काळात आपल्या इकडील स्त्रियांत श्री. वहिनीबाईंची योग्यता फार मोठी आहे. आपल्या वयाची सत्तीवीस वर्षे ज्यांनी त्या विभूतीबरोबर त्यांची सहधर्मचारिणी या नात्याने 'सावली' प्रमाणे घालविली, ज्यांच्या अंगचे नैसर्गिक तेज शिक्षणाने व अतिथोर सहवासाने अनेक पटींनी वृद्धिंगत झाले, व ज्यांचे मन रावसाहेबांच्या भक्तींत कायमचे गढ़ून राहिले आहे, त्यांनी आपल्य दिगंतकीर्ती पतीच्या स्वभावाचे व आयुष्यक्रमाचे काढलेले चित्र आपणास पाहावयास मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांस अभिमान व समाधान वाटणे साहजिक आहे."

"स्त्रियांच्या मनोधर्माचे मोहक रूप:हे पुस्तक वाचणाराचे मनावर ज्या कित्येक गोष्टींचा विशेष ठसा उमटल्याशिवाय राहाणार नाही, त्यापैकी एकदोहोंचा येथे उल्लेख करणे जरूर वाटते. पाश्चिमात्य समाजात पुष्कळ कुटुंबांत पतिपत्नींमध्ये पराकाष्ठेचे प्रेम आढळते, पण त्यांचा परस्परभाव बहुतेक बरोबरीचा असतो; पण तशा तऱ्हेचेच प्रेम उभयतांमध्ये असता पत्नीने पतीच्या सेवेस आपणास सर्वस्वी वाहून घेऊन त्यातच धन्यता मानावी, हा पूर्वेकडील स्त्रियांचा व त्यातही हिंदुस्थानातील स्त्रियांचा विशेष मनोधर्म आहे.
हा मनोधर्म हजारो वर्षांच्या संस्कराचे व परंपरेचे फल आहे व त्याचे अत्यंत मोहक स्वरूप या पुस्तकात दिसून येत आहे. 
नवे शिक्षण, नव्या कल्पना व नवी परिस्थिती यांनी विचारास व आयुष्यक्रमास नवे वळण लागले असताही वहिनीबाईंसारख्या स्त्रियांचा हा मनोधर्म आहे तसाच कायम राहातो, यापासून पुष्कळ बोध घेता येण्यासारखा आहे."

Friday, 31 March 2023

डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र /लेखिका -काशीबाई कानिटकर


सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील या  तीन मराठी स्त्रिया ज्यांनी येथील सामाजिक स्थित्यंतर स्वतः पासून सुरू केलं..! 
आपल्या इच्छा शक्तीने,जिद्दीने समाज  आणि स्वतःच्या अप्त स्वकियांचा विरोध सहन करून त्या शिकल्या.ज्या काळात मुलींना शिक्षण हे पाप मानल गेलं.

आपल्या नवऱ्याच्या भरभक्कम साथीने त्या घरातील आणि समाजातील निंदा नालस्ती ला पुरून उरल्या.स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा कायमचा उठवला


डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र
लेखिका:काशीबाई कानिटकर
दुसरी आवृत्ती:१९१२
चौथी आवृत्ती:२०१९(त्याचेच लेटेस्ट पुनर्मुद्रण)
पेज:३२८ मूल्य:३५०/

ज्या काळात भारतीय स्त्रीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं, त्या काळात एक  सतरा स्त्री एकटीच परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते ही क्रांतिकारकच म्हणावी अशी घटना होती. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशींचं नाव आज आपण अतीव आदराने घेतो.

या उच्चविद्याविभूषित स्त्रीचं चरित्र त्यांच्या मृत्यनंतर काशीबाई कानिटकर यांनी लिहिलं. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर म्हणून त्यांचं चरित्र लिहिलं गेलं पाहिजे आणि ते तेवढ्याच तोलाच्या स्त्रीने लिहिलं पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. या संदर्भात काशीबाई लिहितात, 
“सौ. डॉ. आनंदीबाईंचे चरित्र लिहिण्यास त्यांच्या तोलाचेच मनुष्य पाहिजे होते, व ही इच्छा माझ्या एका विद्वान मैत्रिणीजवळ मी एके प्रसंगी व्यक्त केली होती; परंतु कार्यबाहुल्यामुळे तिने नन्नाच्या पाढ्यासारखेच उत्तर दिले. झाले काम तर तेथेच होईल अशी माझी अशा होती, ती निष्फळ झाल्यासारखी मला वाटली. 
कारण त्या एका मैत्रिणीशिवाय पुस्तक लिहिण्यासारखी विद्वान स्त्री माझ्या ओळखीची व योग्य अशी दुसरी आढळण्यास नाही. 
तेव्हा मला असा विचार पडला की, आता कोणाला विचारावे! शेवटी काहीच जमेना, तेव्हा हे काम वेडेवाकडे आपणच करून टाकावे, असा मी निश्चय केला.” काशीताईंना जरी हे ‘वेडेवाकडे’ वाटत असले तरी या चरित्राची दाखल तत्कालीन विविध नियतकालिकांनी घेतलेली दिसते. 
काहींनी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं असलं तरी काहींनी प्रखर टीकाही केली. मात्र या लेखनामुळेच आनंदीबाईंचं तपशीलवार चरित्र पुढील पिढ्यांना उपलब्ध होऊ शकलं, हे या पुस्तकाचं मोठं योगदान आहे. 
अवघ्या दहा दिवसांचं मूल उपचाराअभावी दगावलं तेव्हा त्या दुःखातून सावरताना आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकट्याने अमेरिकेला जाऊन आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 
अनेक आपत्तींना तोंड देत त्यांनी शिक्षण कसं पूर्ण केलं ते काशीबाईंनी आपल्या पुस्तकात अगदी मनःपूर्वक लिहिलं आहे.
याबरोबरच आनंदीबाईंच्या पती गोपाळराव यांचं चरित्रही त्यांनी रेखाटलं आहे.

पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास लेखिका: गौरी अनिल इंदुलकर

देवाच्या शोधात हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे ...