देवाच्या शोधात
हे पुस्तक ईश्वराच्या अस्तित्वाचे लेखिकेला आलेले पुन्हा पुन्हा प्रत्यंतर होय! श्रध्देचा आणि वाचनाचा परिणाम म्हणून लेखिकेला जे दिव्य अनुभव आले,त्या अनुभूतीची ,त्या दैवी सहवासाची आणि कृपेची शब्दात केलेली मांडणी म्हणजे हे पुस्तक!
पुस्तक: देवाच्या शोधात माझा प्रवास
लेखिका: गौरी अनिल इंदुलकर
प्रकार: अध्यात्मिक आत्मकथन
पृष्ठ: २२६
मूल्य: ३००
विज्ञानवादी किंवा तर्काने समजून घेणाऱ्या विश्लेषकाला या पुस्तकातील सर्व घटना योगायोग किंवा सामान्य घटना वाटू शकतील. काहींना अंधविश्वास ही वाटेल...पण श्रध्देने जर विचार केला तर यातील प्रत्येक प्रसंग आपल्याही आयुष्यात येऊ शकतो,आपल्यालाही अनुभूती होऊ शकते...अगदी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा वाचताना देखील!
अमेरिका सारख्या अतिशय सधन देशात रियल इस्टेट सारख्या व्यवसायात अमाप पैसा आणि संपत्ती मिळवलेल्या लेखिकेला वाचनाची प्रचंड आवड! त्यातही अध्यात्मिक पुस्तकांची ओढ अधिक!
ज्ञानेश्वरी चे वाचन करतां करतां लेखिका कुंडलिनी संदर्भात वाचते आणि त्याचा अभ्यास करायला लागते.योगी कथामृत वाचून साधना सुरू करते.श्री गाजाजन विजय ग्रंथ सहज झोपाळ्यावर बसून वाचताना असा काही दिव्य अनुभव येतो,की असे ग्रंथ वाचताना काही नियम असावेत असं वाटतं आणि अनुभवी साधकांशी संवाद सुरू होतो....त्यातून अनेक असे प्रसंग घडतात...जे कल्पनेत ही येऊ शकतं नाहीत.
प्रत्येक प्रकरण वाचताना सजह आणि सोपे वाटतं...पण वाचन झाल्यानंतर मात्र आपल्याला त्या मागची मोठी भूमिका समजते.त्याचा परिणाम होऊ लागतो.आपल्याला माहीत असलेल्या किंबहुना अनेक वेळा वाचलेल्या पुस्तकांचे,ग्रंथांचे मोल समजून येते...जसे तुकाराम गाथा आणि ज्ञानेश्वरी!
प्रस्तुत पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्रिशूळ आहे. त्या त्रिशुलाचे लेखिकेला प्रकाशमान असे दिव्य दर्शन झालेलं आहे...
या पुस्तकाच्या बाबत लेखक आणि इतिहासकार असलेले संदीप भानुदास तापकीर लिहितात,"अध्यात्मासारख्या एका दैवी व रहस्यमय विषयाशी ओळख झाल्यानंतर जिज्ञासा कशी वाढते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरी अनिल इंदुलकरांचे "देवाच्या शोधात" हे पुस्तक! दहा वर्षे मेडिटेशन केल्यानंतर त्यांची चेन्नईच्या भगवती स्वामींची भेट झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वीस वर्षे देवी साधना केलेल्या लेखिकेला या काळात आलेल्या रहस्यमयी, दिव्य व मती कुंठीत करणाऱ्या अनुभवांची आत्मकथा वाचताना आपण भारावून जातो. विशेष म्हणजे मुखपृष्ठावरील त्रिशूल व कुंडलिनी शक्ती यांचे प्रत्यक्ष जिवंत दिव्य दर्शन लेखिकेला झाले आहे."
"आपल्याला आलेल्या अनुभवांची इतर साधकांना माहिती मिळवून प्रोत्साहन मिळावे, हा लेखिकेचा उद्देश निश्चित सफल झाला आहे. देवी अनुभवाचे नाते आपल्या कुटुंबाशी, समाजाशी, धर्माशी व राष्ट्राची नक्कीच आहे, हे या पुस्तकात वाचायला मिळते.मोठमोठे धार्मिक ग्रंथ वाचायला आजकाल कोणालाच वेळ नाही. विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक तसेच अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली आहे."